स्वामी विवेकानंद ( Swami Vivekanand)


     स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकात्यात झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ होते. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धी आणि उच्च विचारांची देणगी त्यांना मिळालेली होती. त्यांचा चेहरा अतिशय तेजस्वी होता. जणू काही चेहऱ्यावरून तेज ओसंडून जात आहे, असेच बघणार्यांना वाटत असे. ते वृत्तीने श्रद्धाळू व कनवाळू होते आणि बालपणात कोणतेही साहसी कृत्य बेधडकपणे करत. पहिल्याच वर्गात त्यांनी अमरकोश पाठ केला. यावरून त्याची बुद्धी किती असामान्य असेल याची कल्पना येते. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. १८८४ मध्ये त्यांनी डफ कॉलेजातून उत्तम गुणांनी बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण करून पदवी प्राप्त केली. त्यांच्या आईची इच्छा त्यांनी वकील बनावे अशी होती, परंतु स्वामीजींचा कल अध्यात्मेकडे होता.
      नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉ. रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्‍त होते. एके दिवशी त्यांचे शेजारी श्री. सुरेंद्रनाथ यांच्याकडेच श्री रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले. स्वामी रामकृष्ण परमहंसांचा साधेपणा, सरळपणा, दृढ आत्मविश्वास, तत्वज्ञान आणि वाणीमधील अद्भुत शक्ती यामुळे ते त्यांचे भक्त बनले. स्वामीजींकडून त्यांनी आध्यात्म आणि वेदान्ताचे ज्ञान प्राप्त केले. पुढे श्री रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण `स्वामी विवेकानंद' असे केले.नरेंद्र व रामकृष्ण यांच्या ईतर शिष्यांनी बडानगर येथे त्यांचा मठ स्थापन केला,
      स्वामी विवेकानंदांचे व्यक्तिमत्व विलक्षण आकर्षक होते. त्यांच्या चेहऱ्यावर अद्वितीय तेज होते. भारतीय धर्म आणि तत्वज्ञानाचे त्यांना चांगले ज्ञान होते. स्वामी विवेकानंदांनी बरीच वर्ष हिमालयात तपश्चर्या केली. तिथे त्यांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले, परंतु त्यांची निष्ठा आणि आध्यात्मिक शक्तीने त्यांना बळ दिले. ते तपस्व्यांच्या सहवासात राहिले. त्यानंतर त्यांनी जगभर प्रवास केला. त्यांची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढू लागली. त्यांनी १८९० साली रामकृष्णांच्या पत्नी शारदादेवी यांचा आशीर्वाद घेतला बाहेर पडले. स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला पचले. तेथील देवालयात त्यांनी ध्यानधारणा सुरु केली. त्यांना रामकृष्णांनी दर्शन दिले. अमेरिकेत भरणार्या सर्वधर्म परिषदेत जाण्याची त्यांना आज्ञां दिली. १८९३ ला त्यांना ३० वर्षे पूर्ण झाली. स्वामींच्या आशीर्वादाने खेतडीच्या महाराजांना पुत्र प्राप्ती झाली.  स्वामी विवेकानंदा ना महाराजांनी अमेरिकेला जाण्यासाठी योग्य पोशाख व भाडे खर्चाला पैसे दिले. 
     ३१ मे १८९३ रोजी `पेनिनशुलर’ बोटीने मुंबईचा किनारा सोडला आणि स्वामी अमेरिकेला विश्वधर्म परिषदेत भाग घेण्यासाठी निघाले.त्यांनी रामकृष्णांच्या फोटोला वंदन करून कालीमातेचे स्मरण केले व भगव्या रंगाचा पोशाख चढविला, भगवा फेटा गुंडाळला, भगवत गीता घेवून त्यांनी बोटीवर प्रवास सुरु केला. चीन, जपान, नंतर ते शिकागो बंदरात उतरले. ११ सप्टेंबर रोजी सर्वधर्म परिषद सुरु झाली. हजारो संख्येने प्रतिनिधी हजर होते. देशोदेशीचे ध्वज फडकत होते. ख्रिस्ती धर्माचे लोक जास्त आले असल्यामुळे ख्रिस्ती धर्माचेच गुणगान ते करीत होते. शेवटी स्वामींची वेळ आली. प्रथम ते घाबरले. पण धीर करून त्यांनी भाषणाला सुरवात केली. “माझ्या अमेरिकन बंधू -भगिनींनो ! या त्यांच्या पहिल्याच वाक्याला सर्वांनी टाळ्यांचा कडकडात केला, तो तब्बल दोन ते तीन मिनिटे चालला. त्यांनी हिंदूधर्मावरील परिपूर्ण भाषण दिले. स्वामीजींचे विदवत्तापूर्ण, ओजस्वी आणि प्रवाही वक्तृत्व ऐकून तेथील जनता मंत्रमुग्ध झाली. त्यांना अनेक विद्यापीठांनी आमंत्रित केले, अनेक पाद्री आणि मोठमोठ्या धर्मगुरूंनी चर्चमध्ये भाषणांसाठी त्यांना बोलावले. तीन वर्ष अमेरिकेत राहून त्यांनी वेदांताचा प्रचार केला. भारतीय तत्वज्ञान व संस्कृती यांची ओळख करून दिली. त्यानंतर ते इंग्लंडला गेले. त्यांच्या अनुयायांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. स्वामीजी १६ सप्टेंबर १९९६ ला स्वदेशी येण्यास निघाले. भारतात परत आल्यानंतर त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. देशभर दौरे करून शांती व समतेचा संदेश दिला.
     स्वामीजी मानव सेवेलाच ईश्वर सेवा समजत. त्यांनी भारतीयांच्या मध्ये स्वातंत्र्य प्राप्तीची इच्छा निर्माण केली. १८५७ मध्ये प्लेगची साथ आली, तेव्हा स्वामीजींनी दीन-दुबळ्यांच्या सेवेसाठी संघटना उभी केली. मुर्शिदाबाद, ढाका, कलकत्ता, मद्रास आदी ठिकाणी सेवाश्रम उघडले. त्यांनी आपल्या प्रवचनांमधून लोकांना आत्मविश्वास, देशप्रेम, बंधुभाव, मानव सेना, अस्पृश्यतेचा संदेश दिला. विवेकानंदांनी शिक्षणावर खूप भर दिला व देशभर अनेक शैक्षणिक केंद्रे उघडली.
      ४ जुलै १९०२ ला स्वामीजींचे देहावसान झाले. आज स्वामीजी आपल्यात नाहीत परंतु त्यांचे जीवन चरित्र दीपस्तंभाप्रमाणे आपणास मार्गदर्शन करीत आहे. त्यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशनच्या शाखा आजही वेदांताचा प्रसार-प्रचार करीत आहेत व जनसेवा करीत आहेत. 
time: 0.0272328854