ask a question

गणेश उत्सव


गणेश चतुर्थीची कथा मला माझ्या आजीने सांगितली ती अशी कि – एके दिवशी गणेश देव आपले आवडते मोडत खाऊन मूषकराजाच्या पाठीवर बसून जात होते. तेव्हा त्यांच्या वाटेत साप आला व उंदीर घाबरून पडले त्यामुळे गणेश पण उंदराच्या पाठीवरुन खाली पडले. त्यांच्या पोटातील सर्व मोदक पण बाहेर येऊन पडले. तेंव्हा त्यांना पाहून आकाशातील चंद्र-तारे त्यांच्या वर हसू लागले. त्यावर गणेशाने चंद्राला शाप दिला कि चतुर्थीला तुझे कोणी दर्शन करणार नाही.
श्री गणेशाची खूप नावे आहेत : विनायक, शिवहर, पार्वतीपुत्र, चतुर्भुज, एकदंत इ. गणेश उत्सव दर वर्षी भारतीय पंचांगानुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्या मध्ये भाद्रपदात महिन्याच्या शुक्ल पक्षापासून सुरु होतो. दहा दिवस हा उत्सव चालतो आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीच्या विसर्जनाने हा उत्सव संपतो.
स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळात ब्रिटिश सरकारने सार्वजनिक सभा व लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घातली होती . त्या वेळी हा सण घरगुती स्वरूपात साजरा केला जात असे. परंतु लोकमान्य टिळकांनी ह्याचे रूपांतर सार्वजनिक उत्सवात केले, जेणेकरून सर्व लोक एकत्र येतील आणि सणाच्या निमित्ताने लोकजागृतीचे काम - जे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप गरजेचे होते, ते ही साधेल . शिवाय धार्मिक कारणासाठी ब्रिटिश सरकार लोकांना एकत्र येण्यास विरोध करू शकणार नाहीत हे हि लो. टिळक यांनी ओळखले होते .
गणेशोत्सवात गणपतीला दुर्वा वाहल्या जातात, फुलांचा हार घातला जातो . गणपतीला आवडणाऱ्या मोदकांचा प्रसाद दाखवला जातो. सकाळ - संध्याकाळ आरती गायली जाते व प्रसादवाटप केले जाते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात वेगवेगळ्या स्पर्धा, नाटकं, नृत्य आयोजित केल्या जातात, ज्यामुळे मुलामुलींच्या कलागुणांना वाव मिळतो. सर्व लोक मिळून सण साजरा केल्यामुळे एकोपाही वाढतो. पूर्वीच्या काळात गणेश मूर्ती लहान व छोट्या स्वरूपात असत परंतु आजकालच्या काळात गणेश मूर्ती फार भव्य दिव्य स्वरूपात तयार केल्या जातात. त्यांच्या समोरचे देखावे सुद्धा तसेच भव्यदिव्य स्वरूपाचे असतात . त्यात ध्वनिक्षेपक जोरात लावल्याने ध्वनी प्रदूषण होते, जे लोक आजारी असतात व ज्या मुलांच्या परीक्षा चालू असतात त्यांना याचा खूप त्रास होतो . या गोष्टींवर आवर घालून हा उत्सव चांगल्या स्वरूपात सादर झाला पाहिजे.
 

time: 0.0102670193