रक्षा बंधन     भारत हा सणांचा देश आहे. रक्षाबंधनासारखा पवित्र सण आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण येतो. म्हणून यास श्रावणी पौर्णिमा असेही म्हणतात. राखीचे हे बंधन भावा बहिणीच्या पावित्र्याचे निदर्शक आहे. रक्षाबंधन हा मने जुळवणारा उत्सव आहे.
     रक्षाबंधनाला ऐतिहासिक महत्त्वही आहे. गुजरातचा अत्याचारी शासक बहादुरशाहने जेव्हा चितोडवर आक्रमण केले आणि चितोडची राणी कर्मवती हीने आपले राज्य वाचविण्यासाठी मोगल राजा हुमायूनला राखी पाठवली. हुमायून राणीची मदत करण्याकरता चितोडला गेला. परंतु हुमायून तिथे पोहोचण्यापूर्वीच राणीने १२०० राजपूत स्त्रियांबरोबर जोहारच्या चितेत प्रवेश केला. हुमायूनने राणी कर्मवतीच्या राखीचा आदर करून चितोडचे रक्षण केले.
     एकदा देव आणि असुरांमध्ये युद्ध झाले. राक्षसांचे म्हणजेच असुरांचे पारडे जड झाले, असुर हरू लागले. तेव्हा असुर पत्नी शचीने इंद्राला राखी बांधली. त्यामुळे इंद्र जिंकला आणि असुर हरले असे एका लोककथेत सांगितले जाते. जग जिकंण्याची आशा ठेवणारा सिकंदर व पोरस यांच्यामध्ये जेवा युद्ध झाले तेव्हा सिकंदराच्या प्रेयसीने पोरसला राखी बांधून त्याच्याकडून वचन घेतले की तो आपल्या हाताने सिकंदरला मारणार नाही. युद्धात सिकंदरला मारण्याची संधी पोरसला मिळाली पण त्याने त्याला सोडून दिले. मोगल काळात मुसलमान स्त्रिया पळवून नेत असत. म्हणून मुली एखाद्या बलशाही पुरुषाला राखी बांधून आपले रक्षण करण्याचे वचन त्याच्याकडून घेत असत. प्राचीन जैन ग्रंथात विष्णुकुमारने बळीराज्याच्या कैदेतून ७०० मुनींची आजच्या दिवशीच सुटका केली होती असे वर्णन आले आहे.
    देशात सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. स्त्रिया सकाळीच घराची स्वच्छता करून मिठाया बनवतात. बहिणी आपल्या भावाला कुंकुम तिलक लावतात. हाताला राखी बांधतात, त्याला ओवाळतात व ईश्वराजवळ त्याच्या दीर्घायुष्याची, यशाची कामना करतात. तऱ्हेतऱ्हेची मिठाई त्याला खाऊ घालतात. त्याच्या मोबदल्यात भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि आपल्या ऐपतीनुसार काही तरी भेटवस्तू देतो. दूर राहणाऱ्या बहिणी आपल्या भावाला पोस्टाने राखी पाठवितात.
     रक्षाबंधन हे भावाबहिणीतील पवित्र भावनांचे बंधन आहे. ते आपणास कर्तव्य परायण होण्यास सांगते.
time: 0.0193209648