माझा भारत देश महान !


 
    मी भारतीय आहे, याचा मला अभिमान आहे. 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत' ही प्रतिज्ञा वाचताना माझा ऊर अभिमानाने भरून येतो. 
    भारत हा प्राचीन देश आहे. त्याचा इतिहास वैभवशाली आहे. प्राचीन काळात भारत समृद्ध व ज्ञानात अग्रेसर होता, सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. जगातील विद्वान भारतातील तक्षशिला, नालंदा या विद्यापीठांत ज्ञान घेण्यासाठी येत असत. विद्यांप्रमाणे विविध कलांमध्येही माझ्या भारताची मोठी कामगिरी आहे.
    भारतात भौगोलिक विविधता आहे. भारताच्या तीन बाजूंनी सागर व उत्तरेला उत्तुंग हिमालयाची सीमा आहे. भारतातील हवामान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असल्याने धान्ये, फळे, भाज्या, फुले यांच्यातही विविधता आढळते.भारतात विविध धर्माचे लोक राहतात व ते भिन्न भाषा बोलतात. या सर्व भाषांतील साहित्य समृद्ध आहे. भारत हा जसा वीरांचा, शूरांचा देश आहे, तसाच तो संतांचाही देश आहे. येथे अनेक थोर समाजसुधारक व विचारवंतही होऊन गेले. या साऱ्यांनी भारतीय जनतेत उच्च, उदात्त मूल्ये रुजवली, म्हणूनच अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने भारताने आपले स्वातंत्र्य मिळवले.
    भारताने दीडशे वर्षे गुलामगिरी साहिली. तेव्हा एकजूट होऊन भारतीयांनी लढा दिला व १९४७ साली स्वातंत्र्य मिळवले. स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत विकास साधला. आजही माझा भारत सतत प्रगती करत आहे. या विशाल देशाला अनेक नैसर्गिक आपत्तींना व मानवनिर्मित संकटांना वेळोवेळी तोंड द्यावे लागले आहे. पण सर्व भारतीय संघटित होऊन मोठ्या जिद्दीने त्यांवर मात करतात.
    विविध जाती,विविध धर्म व विविध भाषा ही भारताची वैशिष्ट्ये आहेत. तरीपण प्रेमाने सारे भारतीय एकत्र राहतात. क्वचित काही समाजविघातक शक्ती भारतीयांचे हे ऐक्य व बांधुभाव नष्ट करण्याचा यत्न करतात; पण या देशाचे ऐक्य अबाधित राहिले आहे.
    मनुष्यबळ ही भारताची मोठी शक्ती आहे. हरितक्रांतीच्या मार्गाने जाऊन भारत अन्नधान्याच्याबाबतीत स्वावलंबी झाला. श्वेतक्रांती झाल्यामुळे दह्यादुधाची लयलूट झाली. आज औद्योगिक आणि वैज्ञानिक क्षेत्रांतही भारत प्रगती करत आहे. नुकतेच, चंद्रावर यशस्वीरीत्या चांद्रयान पाठवून भारताने प्रगतीचा एक मोठा टप्पा पार केला आहे. म्हणूनच माझा भारत देश महान आहे. असा माझा भारत देश मला अतिशय प्रिय आहे. 
 
time: 0.0142910480